विना अनुदानीत शाळांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, ३० हजार शिक्षक-शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

Foto

मुंबई – राज्यातील विना अनुदानीत ३० हजार शिक्षकांना अनुदानाचा लाभ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विना अनुदानीत शाळांना अनुदानाचा लाभ देण्याचे आश्वस्त केले. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संबंधीची तरतूद केली जाणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत निवदेन केले. पदवीधर आमदार सतीश चव्हाण आणि शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी त्यांचे स्वागत केले.

काय आहे शिक्षण मंत्र्यांच्या निवेदनात

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिली. ते म्हणाले, अघोषित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, कार्योत्तर मान्यता अट शिथिल केल्यास पात्र होणाऱ्या उच्च माध्यमिक शाळा, घोषित उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्या यांना येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुदानाची तरतूद करण्यात येईल. त्यासाठीची प्रशासकीय तरतुद येत्या दोन महिन्यात पूर्ण केली जाईल.  अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शिक्षकांचा एकही प्रश्न प्रलंबित राहाणार नाही. शिक्षणमंत्र्यांच्या निवदेनाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण आणि शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी स्वागत केले.

राज्यातील २९०७ शाळा आणि ४३१९ तुकड्यांवरील २३,८०७ शिक्षक आणि ५३५२ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे तावडे यांनी सभागृहात सांगितले. यासाठी शासनावर अंदाजे २७५ कोटींचा बोजा येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.